लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शंभरावर परिवार दाखल झाले असून कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांचा प्रश्न आता सुटला आहे.खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे. अशातच हाताला काम नसलेल्या पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यासह इतरही भागातील मजूर कुटुंबीय सेवाग्राम नजिकच्या तुळजापूर गावासह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या टोळ्या गावातच मिळेल त्यांच्याकडे आसरा घेऊन राहात असल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मिटला असून कापूस वेचणीला जोर आला आहे. आता बाहेर जिल्ह्यातून आलेले मजूर सकाळपासूनच कामाला लागत असून त्यांना १४० रुपये मनकी (दहा किलो) मजुरी दिली जात असल्याने गावातील मजुरांचे दरही आवाक्यात आले आहेत. या मजुरांमुळे शेतकऱ्यांची अडचण बऱ्या प्रमाणात सुटली असून आता हे मजूर उलंगवाडी होईपर्यंत इकडेच वास्तव्यास राहणार आहे.शेतकरीच करतात राहण्याची व्यवस्थाविदर्भाच पांढर सोनं असलेल्या कापसाने यावर्षी शेतकºयांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. यावर्षी पºहाटी पाच ते सहा फूट उंच वाढली असली तरी बोंडं मात्र वीसच्या आतच दिसून येत आहेत. त्यामुळे एक-दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असताना मजुरांच्या कमतरतेमुळे वाढीव दर देण्याचा भारही शेतकऱ्यांवर पडला आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेरील मजूर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा हा भार कमी झाला आहे. बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली तर काहींनी गावात पाल टाकून आसरा घेतला आहे.
पश्चिम विदर्भातील मजूर आले वर्ध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM
खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे.
ठळक मुद्देरोजगारासाठी स्थलांतरण : परिवार कापूस वेचणीत व्यस्त