न्यायाची प्रतीक्षा : ग्रॅच्युटीची रक्कम देण्यास टाळाटाळलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक स्व. बापुराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे कार्यरत कामगाराने नोकरी सोडली. यानंतर त्याला ग्रॅज्युईटीची रक्कम मिळणे क्रमप्राप्त होते; पण ती अद्याप देण्यात आली नाही. यामुळे अन्यायग्रस्त कामगाराने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. १० जूनपासून कामगाराने सूतगिरणीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.स्व. बापूराव देशमुख सहकारी सूतगिरणीमध्ये विलास खडसे हे रिंंगफेम डाफर या पदावर कार्यरत होते. ६ डिसेंबर १९८८ पासून ते कार्यरत होते. त्यांनी १६ मे २०१६ रोजी पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा २४ मे २०१६ रोजी मंजूर करण्यात आला. या प्रक्रियेला तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटला आहे; पण अद्यापही त्यांना गॅ्रज्युटीची रक्कम देण्यात आलेली नाही. वास्तविक, नोकरी सोडल्यानंतर ३० दिवसांच्या आत सदर रक्कम मिळणे क्रमप्राप्त होते; पण एक वर्ष लोटले असताना ग्रज्युईटीची रक्कम देण्यात आलेली नाही. सूतगिरणी व्यवस्थापन ती रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप खडसे यांनी निवेदनातून केला आहे. वर्षभराचा कालावधी लोटत असताना नोकरी सोडूनही ग्रॅज्युईटीची रक्कम देण्यात येत नसल्याने कामगारावर अन्याय झाला आहे. याविरूद्ध कामगाराने १० जूनपासून उपोषण सुरू केले आहे. कामगाराच्या संघर्षाला माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, नरेश पेटकर, प्रशांत मानकर, नाना चावरे, प्रभा धनविजय आदींनी भेट देत पाठींबा दिला. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
पाचव्या दिवशीही कामगाराचे उपोषण सुरूच
By admin | Published: June 16, 2017 1:23 AM