दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास दर्शवितो. यातून प्रवासी व पर्यटकांना चुकीच्या इतिहासाचे ज्ञान होत आहे. गांधीजी आणि कस्तुरबांची १५० जयंती देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात साजरी होणार आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार नाही, याची शासन-प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. तो फलक तातडीने काढून सुधारित माहिती देणे गरजेचे आहे.बापूंनी स्वातंत्र्याचा संकल्प घेऊन साबरमती आश्रम सोडले. नंतर बापूंना कारावास झाला. सुटल्यानंतर जमनालाल बजाज यांच्या आग्रहाखातर ते वर्ध्याला आले. १९३६ मध्ये बापू सेवाग्रामला आले. त्यापूर्वी मीरा बहन या गणपतराव चव्हाण यांनी दिलेल्या जागेवर झोपडी बांधून महिलांसाठी कार्य करीत होत्या. गांधीजींनी गावातील लोकांशी चर्चा करून ग्रामोत्थानाचा आपला उद्देश लोकांसमोर ठेवला, राहण्याची परवानगी मागितली, हा सर्व इतिहास लोकांना ज्ञात आहेच. फलकावरील चार चुका मात्र विचार करायला भाग पाडतात. कारण आजही लोकांना आणि नव्या पिढीला गांधीजीविषयी माहिती नसल्याचे दिसून येत असल्याने चुकीच्या गोष्टी खऱ्या आहेत, असे मानले जाईल. फलकावरील माहिती खरी आहे, असा समज होण्याची दाट शक्यता आहे. फलकावर गांधीजींचे पाचवे पुत्र जमनालाल बजाज असा उल्लेख आहे. कस्तुरबांसाठी बापूकुटी बनविण्यात आली. बापूकुटीत बा आणि अन्य लोक राहात होते. नव्या बा कुटीत कैद्यांसोबत महिला अतिथी राहात होत्या, अशी माहिती फलकावर नोंदविलेले असून वर्धा रेल्वे स्थानकावर फलाट एक व दोनच्या अगदी मधोमध असलेला हा फलक असंख्य लोकांना माहिती देण्याचे काम करीत आहे.वास्तविक, गांधीजींना चार मुले होती. जमनालाल बजाज हे पाचवे मानसपुत्र होते. बा साठी बापू कुटी बनविण्यात आलेली नाही. बापंूसोबत बा आणि अन्य कार्यकर्ते बापू कुटीत राहात नव्हते. आताची बापू कुटी मीरा बहन यांनी तयार केली होती. गावातील महिलांना त्या ठिकाणी शिकवायच्या. आश्रमातील सर्वांत पहिली झोपडी तयार करण्यात आली, ती आदी निवास.त् या ठिकाणी बापू,बा आणि अन्य सहकारी राहात होते. त्यामुळे बां ना अनेक अडचणी येत. कारण पुरुष त्या ठिकाणीसुद्धा राहात असे. जमनालाल बजाज यांनी ही बाब लक्षात घेतली. बापूंशी स्वतंत्र व्यवस्थेविषयी चर्चा केली, समजावून सांगितले. शेवटी परवानगी मिळाल्यावर बा कुटी निर्माण करण्यात आली. आश्रमात येणारे देश विदेशातील महिला अतिथी बा सोबत राहात असे. यातील ‘कैदी’ हा उल्लेख चुकीचा आहे.रेल्वेस्थानकावरील फलकावर अशी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे, तर मध्यभागी संगमवरी दगडावरसुद्धा ‘पाचवे पुत्र’ असाच उल्लेख आहे. सेवाग्राम जगाच्या नकाशावर आहे. जवळच सेवाग्राम आश्रम असून खरा इतिहास तिथे मिळू शकतो. फलकावरील माहिती कोठून तरी घेतली असावी, हे नाकारता येत नाही. फलक काढून खरा इतिहास देणे गरजेचे आहे.मी तो फलक वाचला आहे. त्यात चुका असून चुकीचा इतिहास लोकांपर्यंत जाईल. तो फलक काढून चुका दुरूस्त कराव्या. रेल्वेस्थानक प्रबंधकांशी यावर चर्चा झाली आहे.- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
‘त्या’ फलकावर गांधी आश्रमाची चुकीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:28 PM
जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास दर्शवितो.
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावरील प्रकार : चुकीच्या इतिहासाचे होणार ज्ञान