अभिनय खोपडे।आॅनलाईन लोकमतवर्धा : तो वेद शिकला नाही; पण त्याने इतरांच्या वेदना जाणल्या. यातूनच व्याधीग्रस्त रुग्णांच्या सुश्रूषेचा वसा खांद्यावर पेलत कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्धांना सेवा देण्याचे काम सेलू तालुक्याच्या जुवाडी येथील यशवंत अरुण वाघमारे हा करीत आहे. नि:स्वार्थ रुग्ण सेवेची यशवंताची ही वारी परिचारिकेसह जिल्ह्यातील अनेक रुग्णांच्या सुश्रूषेसाठी दिवस-रात्र झटत आहे. त्यांची ही वारी इतरांपर्यंत पोहोचावी याकरिता सेवा घेणारे त्याला मदतही करतात. यशवंताची ही अनोखी रुग्णसेवा अनेक कुटुंबांना दिलासा देणारी ठरत आहे.अनेक रुग्णांना असलेल्या दुर्धर आजारावर रुग्णालयात उपचार केले जातात. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न संपल्यावर अशा रुग्णांना घरी पाठविले जाते. या परिस्थिती विभक्त कुटुंबात असलेल्या वृद्धांची आबाळ होते. सदर रुग्णांकरिता यशवंताची ही वारी वार्धक्यात एक आशेचा किरण ठरत आहे.सेलू तालुक्याच्या जुवाडी येथील अरूण व चंद्रभागा वाघमारे यांचे सुपूत्र यशवंत यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. अठराविश्वे दारिद्र्याने वेढलेल्या कुटुंबात कठीण परिस्थितीत आई-वडिलांनी यशवंताचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००५ मध्ये शेतीची कामे करून यशवंत कसाबसा बारावी उत्तीर्ण झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. यामुळे शिक्षण घेण्याची शक्यता धुसरच होती. परिणामी, यशवंत सेलू बाजारात हमालीचे काम करू लागला. याबाबत घरच्यांना माहिती होऊ नये याची काळजी घेत हमालीच्या मोबदल्यातून शिक्षणाचे पैसे त्याने जमविले. दरम्यान, यशवंताची व्यथा जुवाडी येथील सुशांत वानखेडे यांच्या लक्षात आली. त्यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेत कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे यांना यशवंताची ही परिस्थिती सांगितली. यानंतर सावंगी रुग्णालयात परिचर म्हणून यशवंताला काम देण्यात आले. परिचर म्हणून काम करीत असताना यशवंताने ईसीजी टेक्निशियनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथे नोकरीही केली.काही गरीब रुग्ण डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी सावंगी रुग्णालयात येत. त्यांना स्वत:च्या दुचाकीवर बसवून सेवा पुरविण्याचे काम त्याने सुरू केले. यानंतर त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली. पत्नी मीनल वरिष्ठ परिचारिका असल्याने तिने यशवंतने नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण करावा म्हणून आग्रही भूमिका घेतली. यशवंतच्या नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी मनीषा अभ्युदय मेघे यांचे सहकार्य लाभल्याचे यशवंत आवर्जून सांगतो. २०१३-१४ मध्ये नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण करताना या अभ्यासक्रमाचे ६३ हजार रुपये शुल्क हप्त्याने भरण्यासाठी रात्री पेंटींगची कामे तो करू लागला.अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण रुग्णालयात उपचार झाल्यानंतर घरी पाठविले जातात. आयसीयू, व्हेंटीलेटरवर ठेवल्यानंतर त्या रुग्णांना घरी पाठविले जाते. अशा रुग्णांच्या कुटुंबासमोर त्यांच्या सेवा सुश्रूषेचा प्रश्न निर्माण होतो. आजकाल अनेक ठिकाणी मुले मोठ्या शहरात राहतात. आई-वडील दुसºया गावी राहतात. कुटुंब धनसंपन्न असले तरी रुग्णसेवेसाठी धकाधकीच्या जीवनात कुटुंबातील सदस्यांना वेळ देता येत नाही. अशा कुटुंबातील लोकांना तांत्रिक आरोग्य सेवा सुश्रूषा पुरविण्याचे काम यशवंत वाघमारे व त्यांच्या सहकाºयांनी सुरू केले आहे. अशा रुग्णांच्या घरी जाऊन सर्व प्रकारची सेवा सुश्रूषा अत्यंत आपुलकीच्या भावनेने करण्याचे काम यशवंत व त्यांचे सहकारी करीत आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक रुग्णांना यशवंताच्या सहकाºयांनी ही आरोग्य सेवा घरपोच उपलब्ध करून दिली आहे. यासाठी येणारा नाममात्र खर्च ते या कुटुंबाकडून घेत असले तरी त्यांच्या या सेवेने कुटुंब व रुग्णाला दिलासा देण्याचे काम केले आहे. कुटुंबाचा एक सदस्य बनून हे सर्व काम यशवंत आपल्या परिचारिकांद्वारे करून घेतात. प्रत्येक रुग्णाच्या घरी सकाळी व सायंकाळी भेट देऊन ते आस्थेने उपचार करतात.कीर्तनाने दिला सेवेचा विचारपरिचर म्हणून काम करीत असताना व त्यानंतर रुग्णालयात रुग्णांच्या संपर्कात आल्यावर स्वत:चा उदरनिर्वाह कसाबसा सुरू झाला. या काळात फावल्या वेळात सप्तखंजेरी वादक दीपक भांडेकर यांच्या कीर्तनात तबला वादक म्हणूनही यशवंताने भूमिका बजावली. याच कीर्तनातून राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रभावित होऊन रुग्णसेवेकडे वळण्याचा निर्णय यशवंताने घेतला. राष्ट्रसंताच्या विचाराला वाहून घेत रुग्णसेवेलाच त्याने आता सर्वस्व मानले आहे. ज्यांना आपल्या सेवेची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे यशवंत वाघमारे आवर्जून सांगतात.
यशवंताची वारी रुग्णांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:16 PM
तो वेद शिकला नाही; पण त्याने इतरांच्या वेदना जाणल्या. यातूनच व्याधीग्रस्त रुग्णांच्या सुश्रूषेचा वसा खांद्यावर पेलत कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्धांना सेवा देण्याचे काम सेलू तालुक्याच्या जुवाडी येथील यशवंत अरुण वाघमारे हा करीत आहे.
ठळक मुद्देआकस्मिक सेवेतून परतेल्या रुग्णांची केली जाते सुश्रूषा