वर्धा : कुपोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्यानंतरसुद्धा जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. सरकारी सर्वेक्षणानुसार मागील वर्षभरात जिल्ह्यात तब्बल ५९९ बालके कुपोषित आढळून आली आहेत. ६९ बालके तीव्र, तर ५३० बालके साधारण कुपोषित आढळली आहेत. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होत नसल्याने कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आठही तालुक्यांत राहणाऱ्या शून्य ते ६ वर्षे वयोगटातील सुमारे लाखोंवर बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ५३० बालके ही साधारण, तर ६९ बालके ही तीव्र कुपोषणाच्या विळख्यात आढळून आलेली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कुपोषणाची लक्षणे काय
- अनियोजित वजन कमी होणे.
- तीन ते सहा महिन्यांच्या आत आपल्या शरीराच्या वजनाच्या ५ ते १० टक्के पेक्षा जास्त नुकसान.
- कमकुवत स्नायू असणे.
- नेहमी थकल्यासारखे वाटणे, उदास वाटणे.
- रोग किंवा संक्रमणामध्ये वाढ होणे.
विशेष काळजी घेण्याची गरज
कुपोषित बालकांची संख्या ५९९ च्या घरात आहे. कोरोना काळात अंगणवाड्या बंद असल्या तरी आहार घरोघरी पुरविला जात होता. तरीही या काळात कुपोषित बालकांची वाढती संख्या चिंताजनक बनली आहे. तीव्र कुपोषित सॅम बालके मध्यम कुपोषित मॅम गटात आल्यावर त्यांना पोषण आहार आणि औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मॅम गटातील बालके पुन्हा सॅम गटात जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
हिंगणघाट, वर्ध्यात जास्त संख्या
जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात आणि हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालके आढळून आली आहेत. वर्धा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण मिळून १३ बालके तीव्रं कुपोषित आढळून आली असून, हिंगणघट तालुक्यात १७ बालके तीव्र कुपोषित आढळून आली. इतर तालुक्यांतही कुपोषित बालके आढळली असल्यामुळे कुपोषणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना काहीअंशी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
कुपोषित बालकांची स्थिती (उंचीनुसार)
तालुका - साधारण कुपोषित - तीव्र कुपोषित
वर्धा - १२९ - १३
सेलू - ८८ - ०२
देवळी - ५२ - ०४
आर्वी - १८ - ०९
आष्टी - ५४ - ०४
कारंजा - ५३ - १०
हिंगणघाट - ९८ - १७
एकूण सॅम बालके - ५३०
एकूण मॅम बालके - ६९