लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षी पावसाच्या अनेक नक्षत्रांनी कलाटणी दिली. नको त्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पुरती वाट लागली. असे असले तरी मृगाचा गाढव तर पुष्यचा घोडा चांगलाच बरसणार आहे. दरम्यान बेडूक, म्हैस शेतकऱ्यांना तारणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पावसाचा अंदाज ठरवण्याची परंपरा अनेक वर्षापासून कायम आहे. पंचांगकर्ते नेहमीच हा अंदाज ठरवितात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुखदुःखाचा चक्रव्यूह सुरू ठेवते. मात्र, मागील सात ते आठ वर्षात अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी अंदाज वर्तविला. शेतकरी त्याप्रमाणे शेतीची पेरणी करतोय, मात्र यापूर्वीच्या हंगामात अनेक वेळा कधी अधिक तर अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
मागील वर्षी सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी अनेक नक्षत्र कोरडे पडले तर उत्पादन काढणीला आले असता पाऊस ठराविक अंतराने सतत बरसत गेल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. मशागती पासून तर उत्पन्नापर्यंत बेरीज-वजाबाकी केल्यास बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहिले नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. यंदा सुरुवातीपासून खरीप हंगामाच्या मृग नक्षत्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृग पुष्य पूर्वावर शेतकऱ्यांची भिस्त
मृग नक्षत्रात पाऊस पडला तर पुढील तीन नक्षत्रात पाऊस पडतो. पुष्य व पूर्वा या नक्षत्रात संततधार असल्यास शेतकऱ्यांसाठी मध्यंतरी असलेले नक्षत्र वरदान ठरतात असे मत पंचांगकर्त्यांचे आहे.
नक्षत्र तारखेनुसार,
दिनांक- नक्षत्र- वाहन
८ जून- मृग- गाढव
२१ जून- आद्रा- कोल्हा
५ जुलै- पुनर्वसू- उंदीर
१९ जुलै- पुष्य- घोडा
२ ऑगस्ट- आश्लेषा- मोर
१६ ऑगस्ट- मघा- गाढव
३० ऑगस्ट- पूर्वा- बेडूक
१३ सप्टेंबर- उतरा- म्हैस
२७-सप्टेंबर- हस्त- घोडा
१० ऑक्टोंबर- चित्रा- मोर
यंदा पाच ते सहा नक्षत्रे पावसाची आहेत. आगामी मृग नक्षत्रात पाऊस पडत असला तरी सर्वाधिक पाऊस जुलै व ऑगस्ट महिन्यात राहणार आहे. शेवटी हा अंदाज आहे. हवामानानुसार यात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरण्या कराव्यात.
प्रकाश राऊत, पंचांग जाणकार.
.............................