महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असलेला मान्सून यंदा ३१ मे रोजीला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून विदर्भात हजेरी लावेल. शिवाय यंदा विदर्भात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता हवामान खात्यातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून १५ जूनला विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांचा विचार केल्यास २०१७ आणि २०१८ या वर्षी मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. तर यंदाही मे महिन्यांच्या अखेरच्या दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होत जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात दाखल होण्याची शक्यात वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मान्सूनचे आगमन होताच शेतकरीही पेरणीच्या कामाला गती देतात.
यंदा ३१ मे रोजीला केरळ येथे मान्सून दाखल होत १५ जूनला विदर्भात हजेरी लावण्याची शक्यता आहे. शिवाय यंदाच्या वर्षी विदर्भात सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे.
- गौतम नगराळे, वैज्ञानिक, हवामान विभाग, नागपूर.