अरविंद काकडे आकोली जि.प. व पं.स. च्या निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहे. यासह गावातील पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन चाचपणी केली जात आहे. येळीकेळी गट हा नामाप्र महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. तरी आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. येळीकेळी गण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने तेथे इच्छुकांच्या आशेला पंख फुटले आहे. तर आमगाव (म.) गण महिलांसाठी राखीव आहे. भाजपाकडून सोनाली अशोक कलोडे व मंजुषा संजय दुधबडे यांनी उमेदवारी मागितली. गटातटाच्या राजकारणात सेलू पं.स. च्या विद्यमान सभापती मंजुषा दुधबडे यांचे नाव मागे पडले. अशोक कलोडे यांच्या सौभाग्यवतीचे तिकीट पक्के समजले जात आहे. कॉँग्रेसकडून मनीषा रवी वैरागडे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून दिप्ती राजेंद्र नाखले व वैशाली ओमप्रकाश ढवळे यांनी उमेदवारी मागितली आहे. येळीकेळी गणाकरिता भाजपाच्या मंजुषा दुधबडे, राष्ट्रवादीकडून श्याम वानखेडे, हरीभाऊ झाडे, राजू उडाण तर कॉँग्रेसकडून राजश्री राजेश झाडे, अविनाश वानखेडे यांची नावे चर्चेत आहे. आमगाव (म.) गणात भाजप कडून प्रणाली अरूण गौळकर, शितल अभय ढोकणे, बेबी मारोती भांडेकर, खिराळे तर राष्ट्रवादीकडून सीमा संजय काकडे, सुवर्णा हरीभाऊ येलोरे यांची नावे चर्चेत आहे. नामांकन दाखल करण्याचा अवधी जसा येत आहे तसा निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यातही कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये आघाडी होणार असल्याने इच्छुकांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. यात कोणत्या पक्षाला कुठली उमेदवारी वाट्याला येईल हे वेळच ठरवेल!
येळाकेळी गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: January 25, 2017 1:05 AM