व्हीजेएमचे आवाहन : वृक्षांना पाणी देण्यासाठी टेकडीवर टाके वर्धा : वैद्यकीय जनजागृती मंच नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून या मंचच्या वतीने शहरालगतच्या हनुमान टेकडीवर चार टाके बांधण्यात आले. या टाक्यात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून टेकडीवर लावलेल्या रोपट्यांना नियमीत पाणी मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी परिसरात लावलेल्या रोपट्यांना पाणी द्यावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे. हनुमान टेकडी परिसरात गतवर्षीच्या पावसाळ्यात वैद्यकीय जनजागृती मंच व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत विविध प्रजातीचे शेकडो रोपटे लावले. हनुमान टेकडीला हिरवेगार करण्याचा संकल्प मंचने केला असून टेकडीची होणारी धुप, पावसामुळे होणारे क्षरण रोखण्याचा यामागील उद्देश आहे. सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता या रोपट्यांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी येथे टाके तयार केले. हे टाके भरण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. मंचच्या कार्यकर्त्यांना येथे प्रत्येकवेळी येऊन रोपट्यांना पाणी देणे शक्य नसल्याने टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी सामाजिक जाणीवेतून टाक्यातील पाणी दिले तरी हे रोपटे जिवंत राहू शकतात. पाणी सोबत आणून झाडांना टाकायचे नाही तर तेथे उपलब्ध असलेल्या टाक्यातील पाणी झाडांना द्यायचे आहे. याकरिता अतिरिक्त श्रम घेण्याची गरज नसून केवळ सामाजिक जाणिवेतून हे कार्य केले तरी निसर्ग रक्षणार्थ मोठा हातभार या कृतीतून लागणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
फिरायला येताय ना! मग, रोपट्यांनाही पाणी द्या
By admin | Published: April 20, 2017 12:52 AM