आॅनलाईन लोकमतवर्धा : वंजारी चौक ते लेप्रसी फाऊंडेशनपर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी ९९.२४ लाख रुपयांचा निधी आला; पण काम सुरू झाले नाही. यासाठी महत्त्वाचे नाहरकत प्रमाणपत्र अद्याप वर्धा नगर पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले नाही. यामुळे कामांतील अडथळे दूर करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी, या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाजने सोमवारी न.प. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. या आंदोलनामुळे न.प. कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.वंजारी चौक ते लेप्रसी फाऊंडेशन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून ये-जा करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून दुरूस्तीकरिता वेळोवेळी निवेदने देण्यात आली. रस्त्यासाठी नगर विकास मंत्रालयाने ९९.२४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आल्याचे समोर आले. प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्रच नगर पालिकेने बांधकाम विभागाला दिले नसल्याचेही सांगण्यात आले. ही बाब निंदनिय असल्याचा आरोप करीत ते त्वरित द्यावे. शिवाय प्रत्यक्ष काम सुरू होण्यात येणारे अडथळे त्वरित दूर करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. प्रारंभी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांना त्यांच्या दालनात घेराव घातला. यानंतर आंदोलकांनी न.प. कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर ठिय्या दिला. माहिती मिळताच शहर पोलिसांनी पालिका कार्यालय गाठले. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर आंदोलकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. आंदोलनात पलाश उमाटे, कोमल झाडे, सूर्या हिरेखान, समिर गीरी, गौरव वानखेडे, धरम शेंडे, साहिल नाडे, अभिषेक बाळबुधे, ऋषिकेश बुटले, आकाश हतागळे, आशीष गायकवाड, राहूल सोनटक्के, सागर शेंडे, सौरभ माकोडे, स्वप्नील दौड, बोमले आदी सहभागी झाले होते.भूमिगत मलनि:सारणाचे काम वर्धा न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. सध्या कामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामात सुमारे शहरातील ८० टक्के लोकसंख्या कव्हर केली जाणार आहे. भूमिगत गटारलाईन टाकताना ७० टक्के रस्ते फोडण्यात येणार आहे. वंजारी चौक ते लेप्रसी फाऊंडेशन दरम्यानच्या रस्ता परिसरातही या योजनेंतर्गत काम होणार आहे. परिणामी, नवीन बांधकाम पुन्हा फोडावे लागू नये या हेतूने व मंत्रालयाच्यावतीने प्राप्त सूचनांचा विचार करून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. वंजारी चौक ते लेप्रसी फाऊंडेशन दरम्यानच्या रस्त्याच्या बांधकामातील अडथळे दूर व्हावे यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा.
तरुणांचा न.प. प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:45 PM
वंजारी चौक ते लेप्रसी फाऊंडेशनपर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी ९९.२४ लाख रुपयांचा निधी आला; पण काम सुरू झाले नाही.
ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी आंदोलन