वर्धा : ‘खाकी’च्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत रेल्वे अपघातात जखमी झालेली व्यक्ती अडकली असून, मागील तीन दिवसांपासून ती व्यक्ती पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पडून आहे. मात्र, आरपीएफसह लोहमार्ग आणि पुलगाव पोलिसांनी ‘हद्दी’चे कारण पुढे करत जखमीला पुढील उपचारासाठी न नेता तेथेच सोडून दिले असून, अधिकारी आता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत.
पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला. तो गंभीर जखमी झाला होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी उपस्टेशन प्रबंधकांच्या तक्रारीवरुन जखमी युवकाला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात रेफर केले. मात्र, आरपीएफचे जवान रुग्णालयातून निघून गेले होते. त्यामुळे जखमी व्यक्तिला कोण रुग्णालयात नेईल, हा प्रश्न पडला आहे. मात्र, पुलगाव पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ आपली जबाबदारी झटकून एकमेकांच्या हद्दीकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
तीन दिवसांपासून ‘तो’ उपाशीच
सुजित गंभीर जखमी झाल्याने उठून बसूही शकत नाही. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याच्या नातलगांना माहिती देणे आवश्यक होते. पण, तसे केले नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी कुणाची, जर त्याचा मृत्यू झाला तर कोण जबाबदार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अधिकाऱ्यांनी झटकले हात
पुलगाव येथील आरपीएफ अधिकारी कनौजे यांना विचारले असता जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे. त्यानंतर ही जबाबदारी लोहमार्ग पोलिसांची असल्याचे सांगितले. लोहमार्ग पोलीस अधिकारी दयानंद सरवदे यांनी ७२७ ते ७२९ कि. मी.पर्यंतचे क्षेत्र आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगून त्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. आम्हाला सांगितले असते तर आम्ही काहीही करु शकलो असतो, असे ते म्हणाले.
पुलगाव आरपीएफकडून नेहमीच असे प्रकार होतात. जखमींना रुग्णालयात आणून साेडून देतात. ना नाव, ना पत्ता सांगितला जात. दुसऱ्या दिवशी साधी विचारपूस करण्यासही येत नाहीत. रुग्णालयाकडून ठाणेदारांना पत्र पाठवून योग्य उपचार न झाल्यास सुजितचा जीवही जाऊ शकतो, असे सांगितले आहे. मात्र, कुठलेही उत्तर मिळालेले नाही.
गोपाल नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, पुलगाव.