वर्धा : प्रियकरासह त्याच्या कुटुंबीयाकडून वारंवार सुरू असलेल्या लग्नाच्या तगाद्यामुळे युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वणा नदीच्या पुलावरून उडी मारणार, तेवढ्यातच नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे युवतीचा जीव वाचविण्यात आला. ही घटना हिंगणघाट येथे घडली असून, या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड परिसरातील रहिवासी २५ वर्षीय पूजा हिचे प्रेमदास चकोले रा.शिरुड याच्याशी प्रेमसंबंध होते. प्रेमदास हा नेहमी पूजाला लग्नासाठी तगादा लावायचा. मात्र, पूजाच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने तिने प्रेमदासला स्पष्ट नकार दिला. ही बाब ऐकताच, संतप्त प्रेमदास याने, तू जर माझ्याशी लग्न केले नाही, तर मी मरून जाईन आणि तुलाही फसवून टाकेन, असे म्हणाला.
९ जून रोजी पूजा खोलीवर असताना प्रेमदासचे आई-वडील, बहीण आणि मामा आले व लग्नाचा तगादा लावून धमकी देऊन निघून गेले. याचा पूजाच्या मनावर चांगलाच परिणाम झाल्याने, पूजा थेट वणा नदीच्या पुलावर गेली आणि पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, तेवढ्यातच परिसरातील सजग नागरिकांनी पूजाला पकडून उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी पूजाचे बयाण नोंदवून प्रियकर प्रेमदास चकोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.