लोकाभिमुखतेसाठी जिल्हा प्रशासनाचे पाऊल वर्धा : शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मोबाईलमध्ये एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत ‘आपल्या योजना’ मोबाईल ‘अॅप’ ह उपक्रम जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. यात नागरिकांकडून सुधारणा वा सूचना मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांना ‘आपल्यायोजना२०१७अॅट जीमेल.कॉम’ या ईमेल वा टोल फ्री क्र. १८००२३३२३८३ वर माहिती देता येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजना सामान्यांसाठी राबविल्या जातात; पण विविध योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती नसल्याने नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावे लागते. तथापि, विविध कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होत नसल्याने गाव पातळीवरील नागरिक योजनांच्या माहितीपासून अनभिज्ञ असतात. पर्यायाने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून वेळेचा अपव्यय होतो. नागरिकांना होणाऱ्या मानसिक व आर्थिक त्रासापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागाच्या योजनांबाबतची माहिती ‘आपल्या योजना’ या मोबाईल अॅप तथा ‘आपल्यायोजना.इन’ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘प्ले स्टोअर्स’ मध्ये जाऊन ‘आपल्यायोजना’ टाईप केल्यास सदर ‘अॅप डाऊनलोड’ करता येते. यानंतर योजना व आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना मोबाईलवर दिसेल. अर्ज सादर करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रावर ही सुविधा काही दिवसांत उपलब्ध होईल, असेही कळविले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
माहितीसाठी ‘आपल्या योजना’ मोबाईल अॅप
By admin | Published: March 15, 2017 1:45 AM