लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: खरीप हंगामाच्या सुरूवातीला जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री झाली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत दुबार पेरणी करावी लागली. बोगस बियाणे विक्रेत्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिले होते. पण पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने बुधवारी जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळून द्यावी, अशी मागणी यापूर्वी निवेदन देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सदर निवेदन स्विकारताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी निवेदनकर्त्यांना येत्या दहा दिवसांत या दोन्ही प्रमुख मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले होते. सदर आश्वासन देऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी कुठलीही कार्यवाही न झाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीच कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आलेले उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांनी आंदोलनकर्त्यांनाच असभ्य वागणूक दिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून निषेध नोंदविला. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आश्वासन न पाळणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांची तातडीने गडचिरोली येथे बदली करण्याची मागणी रेटली.आंदोलनकर्त्यांचा पारा चढलापंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आलेल्या आंदोलनकर्त्यांना दोषीच्या कटघऱ्यात उभे करून असभ्यतेची वागणूक देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत हे एकेरी भाषेचा वापर करीत असल्याचे लक्षात येताच आंदोलनकर्त्यांचा पारा चढला आणि संतप्तांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या दालनातील खूर्च्या फेकून कृषी विभागाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला.पोलीस निरीक्षकांनी उघडले कुलूपआंदोलनाची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक ते यांच्या सहकार्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दाखल झाले. पोलिसांचे शासकीय वाहन बघताच आंदोलनकर्त्यांनी स्वत: पुढाकार घेवून शासकीय वाहनात बसले. त्यानंतर जळक यांनी आंदोलनकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून कुलूपाची चाबी स्वत: जवळ घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कुलूप उघडले.आंदोलनकर्ते रामनगर पोलिसांच्या ताब्यातजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध केले. या प्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत कुठलीही तक्रार कृषी विभागाकडून पोलिसांत दाखल करण्यात आली नव्हती.