महेश सायखेडे
वर्धा : राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणाला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील विविध नदींच्या पात्रांमधून वाळूचा उपसा करून सात वाळू डेपोत वाळूचा पुरवठा करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. अधिकृत एजन्सी नियुक्त करताना निविदा प्रक्रिया करण्यात आली. जिल्ह्यातील काही भागात वाळू डेपोही सुरू झाले आहेत; पण वाळू डेपोंमध्ये बदरी टाकून चांगल्या वाळूची थेट विक्रीच केली जात आहे. वाळूचा काळाबाजार करणाऱ्यांकडून काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन नदीच्या पात्रातून उचल केलेली वाळू संबंधित वाळू डेपोत न नेता थेट नागरिकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे.
वाळू माफियांचा मनमर्जी कारभार इतक्यावरच थांबलेला नसून ते वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता वनजमिनींमधून मार्ग तयार करून वाळूची वाहतूक करीत आहेत. असे असले तरी वन किंवा महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहेत. परिणामी, राज्य शासनाचे नवीन वाळू धोरण नागरिकांसाठी पाहिजे त्या प्रमाणात लाभदायक ठरण्यापेक्षा अडचणीत भर टाकणारे ठरत असल्याची ओरड होत आहे.
पेट्रोलपंपावर केली जातात वाळू भरलेली वाहने उभी
नदीपात्रातून उचल केलेली वाळू नियोजित वाळू डेपोत नेणे क्रमप्राप्त असताना नियमांना बगल देत ही वाळू थेट चढ्या दराने नागरिकांना विक्री केली जात आहेच. तू भी चूप... मै भी चूप... असे काहीसे धोरण राबवित हिंगणघाट तालुक्यातील नदीपात्रांमधून वाळूची उचल केल्यावर वाळू भरलेली वाहने सध्या रात्री ८ वाजताच्या सुमारास वर्धा-वायगाव (नि.) मार्गावरील भुगाव टी-पॉईंट भागातील पेट्रोलपंपावर उभी केली जात आहेत. वर्धा शहरातील विविध मार्गांवरील वाहतूक कमी झाल्यावर आणि कुणी ही वाहने पकडणार नाही याची शाश्वती झाल्यावर वाळू भरलेली वाहने थेट शहरात एन्ट्री करतात.
सावंगी (रिठ) वाळू डेपोसाठी नियुक्त एजन्सी सर्वात महागडी
* जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया करून सात वाळू डेपोसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
* आर्वी तालुक्यातील रोहणा येथील वाळू डेपोत वाळूचा पुरवठा करण्यासाठी १३३ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करीत साई ट्रेडिंग काॅर्पोरेशन ही एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
* वर्धा तालुक्यातील आलोडी येथील वाळू डेपोत वाळूचा पुरवठा करण्यासाठी १३३.०१ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून फार्मकिंग ॲग्रो इंडस्ट्री ही एजन्सी नियुक्त केली आहे.
* समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील वाळू डेपोत वाळूचा पुरवठा करण्यासाठी १३५.५६ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून अभिषेक एजन्सी ही एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
* समुद्रपूर तालुक्यातील पारडी या वाळू डेपोला वाळूचा पुरवठा करण्याकरिता १३४.५ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून भूषण वाघमारे बिल्डिंग मटेरियल सप्लायर ही एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
* चिंतोली (बु.) या वाळू डेपोला वाळूचा पुरवठा करण्यासाठी १९४.६७ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून विघ्नेश ट्रेडिंग ही एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.
* सावंगी (रिठ) येथील वाळू डेपोला वाळूचा पुरवठा करण्यासाठी २३३ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून आशिष सावरकर यांना एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
* येळी येथील वाळू डेपोला वाळूचा पुरवठा करण्यासाठी १९३.७१ रुपये प्रति मेट्रिक टन दर निश्चित करून विघ्नेश ट्रेडिंग ही एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे.