वर्धा :जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा कार्यकाळ येत्या दोन ते तीन महिन्यांत संपणार आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार, असे गृहीत धरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आजी, माजी व नवीन उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत आहेत, नमस्कार घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती रोस्टर अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच गावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. आजी- माजी पदाधिकारी तिकिटासाठी कोणत्याही पक्षात जाऊ शकते. तोडाफोडीचे समीकरण निवडणुकीत होणार असे दिसत आहे.
तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. अनेक नवीन युवा उमेदवार आतापासूनच तयारीला लागले असून, लोकांना नमस्कार, रामराम करीत असून, गावातील मृत्यू कार्य झाल्यास पूर्ण सोपस्कर होईपर्यंत स्वतः हजर राहणे, समोरासमोर कामे करणेही सुरू केले आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत. गावात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तर गट, आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद निवडणुक लढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.