लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेला गळती लागल्याने ई-लर्निंगच्या साहित्यासह इतर साहित्यही ओले झाले आहे. येथील दोन वर्ग खोल्यात सतत पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अडचणी निर्माण होत आहे. कंत्राटदाराने केलेल्या सदोष कामाचा फटका विद्यार्थ्यांसह शिक्षकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सन २०१४ मध्ये बांधकाम करण्यात आले. पण, कंत्राटदाराने सदोष बांधकाम केल्याने दरवर्षी पावसाळ्यात शाळेला गळती लागते. या शाळेत चार वर्गखोल्या असून दोन वर्गखोल्या गळत असल्याने त्यामध्ये विद्यार्थी बसण्यात अडचण होते. या शाळेचा पट ७५ असून एक ते सातपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत मुख्याध्यापकांसह दोनच शिक्षक असल्याने शिक्षकांचीही अडचण आहे. आता इमारत गळतीमुळे शाळेतील ई-लर्निंगचे साहित्य, प्रोडुसर, एलसीडी व पंखा आदी साहित्य पावसाने भिजून खराब झाले आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंच आदींना माहिती दिली. पण, कुणीही दखल घेतली नसल्याने रोष व्यक्त होत आहे. या शाळेतील स्वच्छतागृहाला भेगा गेल्या असून कधी पडेल याचा नेम नाही. शाळेच्या पटांगणातही चिखल असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या पटांगणात गट्ठ लावण्यात यावे, शाळेची रंगरंगोटी करावी, धान्य मोजण्यासाठी काटा द्यावा, शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी द्यावी, तसेच इमारतीची गळती दुरूस्ती करून नवीन शालेय साहित्य देण्याची मागणी पालकांनी निवेदनातून केली आहे.
लक्ष देण्याची नितांत गरज...टाकरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब गळत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस येत असल्याने हा स्लॅब केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.