वर्धा : महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गाव असो वा शहर स्वच्छ राहिले पाहिजे. स्वच्छ गाव ही निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला पटवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी खुद्द हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता केली.
संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन अभियान या तीनही अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कारंजा तालुक्यातील नागाझरी या गावात झाला. याच कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या सीईओ रोहन घुगे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता केली. शिवाय शोषखड्ड्यांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, सामान्य प्रशासन तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उपअभियंता विलास काळबांडे, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, सरपंच रमेश लोहकरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचाच : घुगे
संबंधित अभियानात ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. स्वच्छतेच्या कामांमध्ये सर्वांनी पुढे येऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राेहन घुगे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी घुगे यांनी शोषखड्ड्यांसाठी खड्डा खोदला शिवाय नागाझरी गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची सद्य:स्थिती, शास्वत स्वच्छतेबाबत स्थिती, पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनची कामे, घरकुल, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड आदींची पाहणी केली.