- हितेन नाईकपालघर - पालघर तालुक्यातील दातिवरे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल या विषयावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली. याची गंभीर दखल घेत गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला चांगले धारेवर धरले. यावेळी कार्यकारी अभियंता ए. ए. मुळे यांनी दुरुस्ती केल्याने पाणी सुरू झाल्याची माहिती पुरवली आहे. मात्र, दातिवरे गावाला दुरुस्तीनंतर थोडेसे पाणी आले नंतर बंद झाले.
केळवे-माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० सालच्या ४४ वर्षे जुन्या असलेल्या या योजनेकडे गावावर सत्ता गाजविणाऱ्या अनेक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना महिन्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळते. याव्यतिरिक्त त्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागते. पाणी मिळावे, म्हणून मंडल अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. ठाकरे यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर झालेल्या बैठकीत जीवन प्राधिकरण विभागाने मायखोप येथील कामाची दुरुस्ती झाल्यावर पाणी आल्याचा दावा केला. मात्र, तो खोटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आणखी एक वर्ष दातिवरेसह १७ गावांतील लोकांसाठी जीवन प्राधिकरणाकडून सुमारे ५६ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कमीतकमी एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दातिवरे गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न अधांतरीच लटकणार.