मोखाडा - काही महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणुका येणार आहेत. अशावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका खेळीमेळीने लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे व्हायला हव्यात, मात्र काही लोकांच्या आडमुठेपणामुळे निवडणुका रक्तरंजित होतात. आर्थिक नुकसान होते. याशिवाय नातेसंबंधात वाईटपणाही येतो. यामुळे होता होईल तेवढे प्रयत्न करून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल, अशी घोषणा आ. सुनील भुसारा यांनी केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्ताने आयोजित बैठकीप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठीच आपला प्रयत्न असून गावागावांत फूट पडू नये, संबंध खराब होऊ नयेत, यासाठीचा हा प्रयत्न असून बिनविरोधच्या निमित्ताने गावचा विकास करण्यासाठी एकप्रकारे एकोपाच निर्माण होणार असल्याने ही घोषणा केल्याचे भुसारा यांनी सांगितले. भुसारा म्हणाले की, राजकारणात आजही निष्ठेला खूप महत्त्व असून मी आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, हेही निष्ठेचे फळ आहे. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळकटी देण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, तुम्हीही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना लोकांची कामे करा. त्यांच्या घरापर्यंत जा. त्यांच्या अडचणी सोडवा. ज्या तुमच्याकडून सुटणार नाही, त्या मला सांगा, पण आपला वेळ लोकांसाठी, समाजासाठी द्या. तुमच्या कामाची दखल पक्ष नक्की घेईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी गटनेते नररेश आकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, जि. प. सदस्य हबीब शेख, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई भुसारा, तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी, उपाध्यक्ष रामदास कोरडे, प्रदेश सदस्य रघुनाथ पवार आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:00 AM