वसई : वसई प्रांताधिकारी व तहसिलदारांनी अचानक सात रेती बंदरांवर अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा बेकायदा रेती साठा आढळून आला. यावेळी तीन सक्शन पंप आणि तीन फायबर बोटी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसईच्या बंदरांमधून बेकायदा रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आल्यावरून प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर आणि तहसिलदार किरण सुरवसे यांनी शुक्रवारी दुपारीनंतर अचानक रेती बंदरावर छापेमारी सुरु केली. यावेळी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनाही कारवाईत सहभागी करून घेण्यात आले होते. खर्डी रेतीबंदरात २२ लाख ६१ हजार १०० रुपयांचा चोरटा रेतीचा साठा हाती लागला. शिरगाव रेती बंदरात ४९ लाख २६ हजार ७०० रुपयांचा बेकायदा रेती साठा ताब्यात घेण्यात आला. तानसा नदी पात्रात उसगाव येथे सरकारी जागेत दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत ३ लाख ९६ हजार रुपयांचा बेकायदा रेती साठा सापडला. चिमणे बंदरात ३९ लाख ४० हजार २०० रुपयांचा बेकायदा रेती साठा आढळून आला. हेदवडे रेती बंदरात ३६ लाख ३३ हजार ३०० रुपयांची बेकायदा रेती हाती लागली. तर खानिवडे बंदरात १० लाख ३९ हजार ५०० रुपयांचा रेती साठा आढळला.कारवाईत महसूल अधिकारी तीन सक्शन पंप आणि तीन फायबर बोटीही जप्त केल्या. कारवाईत एकही आरोपी पकडता आला नाही. विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, वसईच्या रेती बंदरातून सक्शन पंपाद्वारे अद्यापही बेकायदेशीरपणे रेती उत्खनन केले जात आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी बेकायदा रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे लपून राहिलेले नाही. बेकायदा रेती वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी काही ठिकाणी सीसीटीव्ही असलेल्या चौक्या उभारल्या आहेत. मात्र, याच चौक्यांच्या आशिर्वादाने मुंबई परिसरात वसई विरार परिसरातील रेती विक्री करण्यासाठी नेली जात असल्याचे पहावयास मिळते.
बंदरांमध्ये १ कोटी ६२ लाखांची रेती जप्त, महसूल खात्याची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 3:47 AM