- मंगेश कराळे
नालासोपारा:- मनपाचे माजी स्थायी समिती सभापती तथा बविआचे नगरसेवक प्रशांत राऊत यांना आरोपीने मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून तब्बल एक कोटीची मागणी केली आहे. यामुळे वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे. त्यांनी स्वतः विरार पोलीस ठाण्यात सोमवारी जाऊन तक्रार देत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे २१ मे ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान आरोपी किशोर अंबावकर हा त्यांना मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून काही दिवसापासून पैसे मागत होता. मात्र कुणी तरी मस्करी करत असेल म्हणून त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती. त्या ऑडीओ क्लिपमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम बँक ऑफ बडोदाजवळ आणून दे, नाहीतर तुझ्या मागे इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीवाले तसेच मुंबई व महाराष्ट्र पोलीस मागे लागतील, लक्षक्त ठेव काय बोलतो ते अशी धमकी राऊत यांना देण्यात आली आहे.
१) आगामी निवडणुकांच्या तोंडावर आपल्या राजकीय हितशत्रूनी हा प्रकार जाणीवपूर्वक केला असावा. त्यातून आपल्या राजकीय; पर्यायाने व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाला बाधा पोहचवण्याचा प्रयत्न असावा. यामागील आरोपी व्यक्तींचा पोलिसांनी शोध घ्यावा. - प्रशांत राऊत (माजी स्थायी समिती, सभापती)
२) प्रशांत राऊत यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर खंडणीचा गुन्हा आरोपी विरोधात दाखल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व तपास सुरू आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)