(मंगेश कराळे)
नालासोपारा : जळगाव येथून विरार येथे वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रवाशाची पैशांची बॅग रिक्षात हरवली होती. विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तात्काळ प्रसांगवधानाने तपास करून ४० मिनिटांत हरवलेले १ लाख ६५ हजारांची रोख रक्कम परत मिळवून दिली. प्रवाशाला ते रक्कम मिळाल्याने विरार पोलिसांचे आभार मानले आहे.
जळगाव जिल्ह्यातील नसिराबाद येथे राहणारे उमरअली युसूफ अली सय्यद (४२) यांचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. हे विरार फाटा येथे गाडी खरेदी करण्यासाठी बुधवारी सकाळी विरार स्थानकात रेल्वेने आले. विरार फाटयाला जाण्यासाठी पूर्वेकडून रिक्षा पकडली. तिथे उतरल्यावर १ लाख ६५ हजारांची रोख रक्कम असलेली बॅग रिक्षात विसरले. रिक्षाचा नंबर नसल्याने व पैश्याची बॅग हरवल्याने भयभीत झालेले उमरअली विरार पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना हकीकत सांगितले. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार सचिन लोखंडे, सचिन बळीद आणि प्रफुल्ल सोनार यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तपास व चौकशी करण्यासाठी सांगितले. पोलिसांनी रिक्षाचा नंबर नसतानाही अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून रिक्षाचा नंबर व चालकाचा मोबाईल नंबर मिळवला. रिक्षाचालकाला पोलीस फोन करत होते पण तो प्रतिसाद देत नसल्याने मोबाईलचा सिडीआर व लोकेशन काढून रिक्षाचालकाच्या घरी पोहचले. रिक्षात राहिलेली बॅग व रोख रक्कम पोलीस ठाण्यात पोलिसांनी घेऊन येत उमरअली यांच्या ताब्यात देण्यात आले.