हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर जिल्ह्यातील ४५ वयोगटातील ४८ हजार ५६६ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून १ हजार ४६९ नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने लसीकरण मोहीम काहीशी थंडावली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १६ वर्षे वर्षांखालील एकूण १ हजार ६९३ जणांना कोरोनाने ग्रासले आहे.पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अल्पवयीन मुलांचे तसेच तरुणांचे प्रमाण नगण्य होते. आता ते वाढल्याने चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. एकीकडे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरासह आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे. सरकारने अद्याप ४५ वर्षांखालील नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे लहान मुले तसेच तरुणही बाधित होत असले तरी त्यांना अद्याप लस दिली जात नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
४५ पेक्षा कमी वयाच्या लोकांना दिली जात नाहीजिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सध्या १६ हजार ४६० लोक कोरोनाने बाधित असून त्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के आहे. दरम्यान, ४५ पेक्षा कमी वयाचे १० हजार ८११ रुग्ण आहेत. मात्र लसीकरणाचा आदेश नसल्याने त्यांच्या लसीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. १६ ते ४५ या वयोगटातील ९ हजार ४५७ लोक बाधित आहेत.
मुलांना लस येत नाही, तोपर्यंत निर्बंध पाळा मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत त्या मुलांना कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासाला प्राधान्य देत घरीच राहण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
मुलांमध्ये प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ते कोरोनाबाधित झाले तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्र शासन २५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत प्रयत्नशील आहे. तोपर्यंत मुलांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी.- डॉ. आर. व्ही. दिघुले, पालघर