वसई : या विभागासाठी दहा हजार नवे पोलीस मित्र बनविण्याचा संकल्प अप्पर पोलिस अधिक्षकांनी आॅक्टोबर महिन्यात केला होता. त्याला तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला. १०२५० नवे पोलीस मित्र बनवले गेले असून या पोलिस मित्रांसाठी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुरूवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.वसईतील सर्व पोलीस ठाण्यांना एका महिन्यात दहा हजार पोलिस मित्र बनविण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिले होते. सध्या शहरात अडीच हजार पोलिस मित्र पोलिसांना कामात मदत करीत आहेत. त्यानुसार शहरात वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता त्या तुलनेत सध्या पोलिसांची संख्या कमी आहे. यावर तोडगा म्हणून पोलिस मित्र ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात राबवून पोलिसांच्या कामात चांगल्या नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन करण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले होते. नालासोपारा पोलिस ठाण्यात गुरूवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित पोलिस मित्रांना अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ निरिक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.वस्त्यांमधील गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने पूर्वी पोलिसांकडून मोहल्ला कमिट्यांची स्थापना करण्यात येत होती. ही संकल्पना अत्यंत प्रभाविही होती.मात्र गुन्ह्यांच्या पद्धती आता बदलत चालल्या आहेत. त्यामुळे पोलिस मित्र संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्याचा विचार आता पोलिसांकडून करण्यात आला आहे. सध्या रस्त्यांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीबरोबरच वाहतुकीच्या समस्यातही वाढ होत आहे. यासाठी पोलिसांना शहरात विश्वासू मित्रांची गरज भासू लागली आहे. वाहतूक नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान, विधी विषयक, वैद्यकीय महिला व बाल कल्याण, जेष्ठ नागरीक, व्यापारी, वाहतूकदार, विद्यार्थी, सामाजिक सलोखा इत्यादी क्षेत्राशी निगडीत निगडीत असलेल्या नागरिकांना पोलिस मित्र बनवून एक प्रकारे पोलिसांची मदत व सोबत समाजसेवा करता येणार आहे.पोलिस मित्र बनण्यासाठी एक अर्ज पोलिसांकडून वितरित करण्यात आला होता, त्यात आपली संपुर्ण वैयिक्तक माहिती फोटो सहित इच्छुकांकडून भरून घेण्यात आली होती. इच्छुक प्रतिनिधीवर पोलिस दप्तरी कोणताही गुन्हा किंवा न्यायालयीन प्रकरण नोंद असेल तर त्याचीही माहिती त्यांना द्यावी लागली होती. विशेष म्हणजे या अर्जांमध्ये महिलांचा समावेश आहे.पोलिसांच्या विविध कामात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी हि संकल्पना राबवली जात असते. सध्या १०२५० पोलिस मित्रांची नोंदणी झालेली आहे. यांची संख्या वाढविणार आहोत. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून स्थानिक पोलिस त्यांच्या सतत संपर्कात राहणार आहेत.- विजयकांत सागर , अप्पर पोलिस अधीक्षक वसई
वसई विभागात १० हजार पोलिस मित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:49 AM