- मंगेश कराळे नालासोपारा - वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्याने या रिसॉर्टमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. बुधवारी सकाळी विरारच्या कारगिल नगरमधील श्री साई क्रांती चाळीत राहणारी रिद्धी माने (१०) ही चिमुकली आपल्या कुटुंबासह पिकनिकला रानगांवच्या रॉयल रिसॉर्टमध्ये आली होती. घटनेच्या वेळी रिद्धी ही लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये खेळत असताना तिची आई रिद्धीला खाण्यासाठी सामान खरेदीसाठी बाहेर असलेल्या दुकानामध्ये गेली. त्यावेळी रिद्धीने मोठ्या स्विमिंग पुलमध्ये खेळण्यासाठी उडी मारली. पण तिला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला आहे. वसई विरारच्या रिसॉर्ट मधील जलतरण तलावात यापूर्वी देखील अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठलेही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.