लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवघेणे बनत असून, गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर हे दोन्ही टोलनाके बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ टोल नाके बंद करण्यात आले होते.
महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, असा पवित्रा खा. गावित यांनी घेत ठेकेदार कंपनीला धारेवर धरले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस , सुमित कुमार, ऋषिकेश पाटील, तसेच कासा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, महामार्ग पोलिस निरीक्षक बाळू राठोड आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत शंभरहून अधिक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. वारंवार इशारा देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत ठेकेदार कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसताना टोल मात्र वसूल केला जात आहे. यामुळे शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धडक देत वाहनांकडून केली जाणारी टोल वसुली बंद केली.
खानिवडे येथे काँग्रेसचे विजय पाटील, शिवसेना वसई-विरार जिल्हा अध्यक्ष नीलेश तेंडोलकर आदींनी भाग घेत टोल वसुली बंद केली, तर डहाणूच्या रोटी टोल नाक्यावर साडेबारा वाजता खा. राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख उपस्थित होते.
आम्ही सत्ताधारी पक्षात असलो; तरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. सद्या या मार्गावर खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर टोल बंद आंदोलन करावे लागले.- राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना
महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. अनेक वेळा आंदोलने केली असून, या महामार्गाची सुधारणा केली जात नाही याची खंत आहे.- श्रीनिवास वनगा, आमदार शिवसेना.