पारोळ : राज्य शासनाने रुग्णसेवा तत्काळ मिळावी म्हणून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली मात्र, पारोळ परिसरातील बहुतेक रुग्णांना तिने नाराज केले आहे. गोरगरिबांची जीवनवाहिनी म्हणून तिची ओळख असली तरी फोन केल्यावर तो होल्डवर जातो किंवा रुग्णवाहिका तरी नादुरुस्त असते. ही सेवा चांगली असली तरी वसई तालुक्यात हा प्रयोग आरंभशूर वाटतोे.मेढा गावच्या दुर्गम असलेल्या प्लॉट पाडा येथील वंदना संतोष पागी यांना प्रसूती वेदना होत असल्याने दुपारी सुमारास तिला खाजगी रिक्षाने पारोळ पी. एच. सी. सेंटर येथे आणण्यात आले. मात्र, येथे काम चालू असल्याने तिला वसईला हलविण्यास सांगितले. पीएचसी सेंटरमधील वाहन इतरत्र गेले असल्याने तातडीची व्यवस्था म्हणून १०८ वर कॉल करण्यात आला होता. तो होल्डवर गेला.शेवटी शिवसेना चांंदिप शाखेची रुग्णवाहिका मदतीला धावली खरी मात्र ती नादुरुस्त असल्याने रुग्णाला शिरसाड नाक्यापर्यंत पोहचविण्यात आले. पुन्हा १०८ क्रमांकाला संपर्क साधण्यात आला. मात्र पुन्हा कॉल होल्डवर ठेवल्याने रुग्णाच्या कुटुंबियांसमोर पुढे करायचे काय असा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी हा बाका प्रसंग ओळखून परिसरातील तरुणांनी खाजगी वाहन आडवून रुग्णाला वसई गाव येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, त्या अॅडमिट झाल्यानंतर विरार येथून निघालेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका शिरसाड नाक्यावर पोहचली.
ग्रामीण भागातील १०८ सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:56 AM