मीरारोड : सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मीरा भाईंदर शहरात ११ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार आहेत. त्यापैकी एका केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा सुविधे साठी १० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २ उपकेंद्रे सुरू केलेली आहेत. सदर आरोग्य केंद्रां मधून नागरिकांना नाममात्र दरात बह्योपचारची सुविधा मिळते. त्यामुळे पालिकेची आरोग्य केंद्रे ही सामान्य नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहेत. रोज सरासरी सुमारे हजार ते अकराशे रुग्ण आरोग्य केंद्रातील उपचारांचा लाभ घेत असतात.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता सदर प्राथमिक आरोग्य केंद्र ही कमी पडत आहेत. नागरिकांची गर्दी त्यातच विविध प्रकारचे लसीकरण आदी सुरू असल्याने सध्याच्या आरोग्य केंद्रांवर ताण पडतो. शिवाय आरोग्य केंद्र च्या परिसरातील नागरिकांना लाभ मिळत असला तरी अन्य भागातील नागरिकांना ही सुविधा मिळत नव्हती.
आता सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी अभियानाअंतर्गत निधी टप्या टप्याने उपलब्ध होत असल्याने शहरात आणखी ११ आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता पर्यंत ज्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नव्हता त्यांना नाममात्र दरात आरोग्य सेवा मिळणार आहे.
११ पैकी ६ आरोग्य वर्धिनी केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर उर्वरित केंद्राचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. इंद्रलोक येथील पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र हे १ मे महाराष्ट्र दिनी आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते लोकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे. यावेळी पालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. उर्वरित केंद्रे ही टप्प्या टप्प्याने सुरू केली जाणार आहेत. १५ ते २० हजार लोकसंख्ये मागे एक आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निकष आहे .
सदर आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी , परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग स्टाफ इतका मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे. सदर केंद्रामध्ये बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी व लसीकरण या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली. सदर आरोग्यवर्धिनी केंद्राचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.