वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी तब्बल ११२७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. दरम्यान, दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून २२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १२,५७३ वर पोहोचली आहे. वसई-विरार महापालिका परिसरामध्ये सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक ११२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याच वेळी दिवसभरात २२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई ८५, वसई-विरार-३, नायगाव-६, नालासोपारा-६२ आणि विरार- ६७ रुग्ण आढळले आहेत. यात १३६ पुरुष आणि ६२ महिला रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, शहरात ११२७ रुग्ण घरी परतल्यामुळे आजवर मुक्त रुग्णांची संख्या ९ हजार २३३ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर शहरात एकूण ३ हजार ८४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर सोमवारी वसई आणि विरार येथील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजवर पालिका हद्दीतील २५६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारात आपला जीव गमावला आहे.
जव्हारमध्ये कोरोना नियंत्रणातजव्हार : जव्हार तालुक्यात मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा आकडा शून्य असून १ व २ आॅगस्ट रोजी प्रत्येकी एक, तर ३ आॅगस्ट रोजी ३ नवीन रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील भुरीटेक गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
२१ जुलै रोजी ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते, त्यानंतर सलग ९ दिवस एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली नाही. ३ आॅगस्टपर्यंत फक्त सात रुग्ण उपचार घेत असून १७० रुग्ण बरे झालेले आहेत, तसेचदोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.जून व जुलै महिन्यात कोरोनाचा कहर जव्हार शहरात बघावयास मिळाला होता. एका-एका दिवसात ३० ते ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत होती. हा आकडा १७९ पर्यंत पोहोचला आहे.दरम्यान, यातील ९५ टक्के रुग्ण अस्मिटोमॅटिक होते. त्यामुळे आरोग्य विभागाला लवकरच या कोरोना- बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.