शिरोळ: दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार महिन्यांत दहा लाख रुपयांहून अधिक नफा मिळविला आहे. अजून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे़ अन्य शेतकरी हे पिक पाहण्यासाठी येत आहेत़ हाळ चिंचवाड भागात पाटोळे यांची शेती आहे़ त्यातील सत्तर गुंठ्यांच्या क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यात उभी-आडवी नांगरणी करून मशागत केली़ यानंतर डीएपी, पोटॅश, बोलोफॉल, लिंबोळी पेंड, पेरॅमिन, रिझेटर, आदींचे मिश्रण करून रानात टाकल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने साडेचार फुटी सऱ्या सोडल्या़योग्य पद्धतीने बेड व ठिबक पाईप केल्या़ बेडवर मिल्चिंग पेपर अंथरूण व्हीएनआर १०९/३३२ जातीच्या मिरचीची सत्तर गुंठे क्षेत्रात १५ हजार ५०० रोपे लावली़ त्यानंतर दोन दिवसाआड बुरशीनाशक आळवणी करून घेण्यात आली, तर प्रत्येकी चार दिवसांनी पीक सुधरण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ मिरचीला टोमॅटोसारखी तारकाठी बांधली़ तीस दिवसांनंतर मिरची लागणीला सुरुवात झाली़ फुलकळीच्या काळात योग्य औषधफवारणी करून पहिली तोडणी ४५ दिवसांनंतर केली़ पहिल्या तोडणीला एक टन मिरची निघाली़मिरचीला सरासरी ४०, ५०, ६०, ७५ रुपये किलोला दर लागत असून, मिरचीची आवक सध्या बाजारात कमी असल्याने या मिरचीला सांगली, मिरज, कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांकडून मागणी आहे़ सध्या उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने मिरची पीक धोक्यात येण्याची शक्यता होती़ मात्र, पाटोळे यांनी या पिकाची व्यवस्थीतपणे काळजी घेऊन पीक योग्य त्या पद्धतीने टिकवून अग्रेसर उत्पादन घेतले जात आहे़ मिरचीचे दररोज ८०० ते ९०० किलो उत्पादन निघत आहे. त्यातून ५० ते ६० हजार रुपय मिळत आहेत़. प्रतिपोते २० रुपये वाहतूक व कामगारांचा पगार वगळता ४० ते ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा दररोज मिळत आहे़ दरम्यान, अजून दोन महिन्यात २० टन मिरची निघण्याची अपेक्षा आहे़ त्यातून आठ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते, अशी आशा पाटोळे यांना आहे़ या मिरची लागवडीसाठी पाटोळे यांना दोन लाख रुपये खर्च आला होता़ दैनंदिन कामगारांचा पगार व वाहतूक तसेच औषधे यांना पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो़़ त्यातूनच आतापर्यंत तोडा झालेल्या ३० टन मिरचीतून १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ अजूनही चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरी मिरचीचा १२ लाखांचा ठसका
By admin | Published: May 31, 2016 2:47 AM