पालघर/वाडा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्यांवर स्थलांतरित होऊन आलेल्या मजुरांची, बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हाभरात हे अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण १७३ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यात १३ हजार ९६४ इतक्या व्यक्ती स्थलांतरित होऊन आलेल्या आढळल्या.
या मोहिमेत ० ते ६ या वयोगटातील १८६९ बालकांची तपासणी करण्यात आली, तर १ हजार १९२ किशोरवयीन मुली, १४८ गर्भवती माता, १६२ स्तनदा माता, २ हजार ७६५ इतर अशा एकूण ६ हजार १३६ व्यक्तींची वीटभट्टीवर तपासणी करण्यात आली. यातून १६२ आजारी व्यक्ती आढळून आल्या. त्यांच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्यांवर आरोग्य तपासणी शिबिर लावण्यात आले होते. जवळील आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व मजुरांची, महिलांची, गरोदर महिला, स्तनदा माता, बालके यांची तपासणी करण्यात आली. अंगणवाडी सेविका, परिचारिका यांच्या वसुरी खुर्द येथील वीटभट्टीवर महिला व बालकल्याण सभापती अनुश्री ठाकरे, जि.प. सदस्य शशी पाटील, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, महिला व बालविकास अधिकारी प्रवीण भावसार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकरी मयुरी कर्पे, आशा व अंगणवाडी सेविका, परिचारिका देखील उपस्थित होत्या.
या शिबिरांमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. - अनुश्री ठाकरे, सभापती, महिला व बालकल्याण
जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केले असून, या शिबिरांमधून जी माहिती समोर आली. त्यावरून पुढील नियोजन करण्यात येईल.- सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी