नालासोपारा : उत्तर कोकणातील प्राचीन, शिलाहारकालीन, पेशवेकालीन (नव्याने जीर्णोद्धार झालेली) व ब्रिटिश कालखंडात (नव्याने सनदा उपलब्ध झालेली) देवस्थाने अभ्यासकांच्या व संशोधकांच्या नेहमीच कुतूहलतेचा विषय ठरलेली आहेत. यात विशेषत: हनुमान, गणपती, शंभू महादेव, आदिशक्ती ही दैवते प्रामुख्याने लक्ष वेधतात. वसईतील फडके कुटुंबियांकडे मोडी लिपीत असणाऱ्या गणपती व हनुमान देवस्थानाच्या इ.स १८६७ सालच्या सनदेला सप्टेंबर २०१८ रोजी १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.नरवीर चिमाजी आप्पा पेशव्यांच्या इ.स १७३९ च्या वसई मोहिमेतील गौरवशाली विजयानंतर वसई, आगाशी, गोखिवरे, निर्मळ, पालघर, तुंगार, बाजीपुर प्रांतातील अनेक लहान मोठया देवस्थानाची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार केल्याची उदाहरणे आहेत. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे अभ्यासक श्रीदत्त राऊत व विष्णुप्रिया कुलकर्णी वसई प्रांतातील देवस्थाने व इतर इतिहास विषयक घटनांशी संबंधित मोडी लिपी पत्रांचा सातत्याने मागोवा घेत आहेत, यातच वसईच्या पेशवेकालीन इतिहासाची साक्ष जपणाºया ‘‘श्री फडके गणपती’’ मंदिराचा इतिहास आता प्रथमच प्रकाशित होत आहे.सद्या वसईकरांना ‘‘श्री सिद्धिविनायक गणेश’’ स्थळ रमेदी धोवली या नावानेच परिचित आहे. खाजगी मालकीच्या अंतर्गत जपलेले व सुस्थितीत असणारे हे पेशवेकालीन श्री गणेशाचे मंदिर पुजारी नारायण केशव फडके (नाना) व समस्त फडके कुटुंबियांनी अत्यंत उत्तम रीतीने सांभाळले आहे. सद्या या ठिकाणी फडके कुटूंबियांची पाचवी पिढी कार्यरत आहे.या कुटुंबियांकडे मोडी लिपीत असणाºया गणपती व हनुमान देवस्थानाची इ.स १८६७ सालची सनद असून तिला सप्टेंबर २०१८ रोजी तब्बल १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ती मध्ये मुंबई ब्रिटिश गव्हर्नर यांचा उल्लेख असून गणेश देवस्थानास ७२ रु पये व हनुमान देवस्थानास १९ रु पयांची सनद नेमणूक केल्याचे नमूद केलेले आहे. यावर १० सप्टेंबर १८६७ असे इंग्रजीतून तारीख नमूद आहे. या सनदेचे एक वेगळेपण म्हणजे यात एकाच पानावर एका बाजूस मोडी लिपीतील मजकूर व दुसर्या बाजूस इंग्रजी लिपीतील मजकूर लिहिण्यात आलेला आहे.यातच सदर देवस्थानाची १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातील काही पत्रे लिप्यंतर व प्रकाशित व्हावी यासाठी करण्यात येणारे काम अंतिम टप्प्यात आहे असे सांगितले. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाच्या प्रमुख विष्णुप्रिया कुलकर्णी यांनी याबाबत माहिती देताना सांगीतले कि,सदर देवस्थानाचे पेशवे कालखंडातील नेमणूक बाबतीतील काही मोडी कागदपत्रे आमच्या संग्रही संकलित झालेले असून त्यात आज नव्याने उपलब्ध झालेल्या इ.स १८६७ सालच्या सनदेने इतिहास प्रवाहास गती मिळेल. त्यामुळे वसईच्या इतिहासावर प्रकाश पडला असून त्याची नोंद अभ्यासक घेणार आहेत.
वसईच्या इतिहासाची १५१ वर्षांची सनद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:19 AM