हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या हालचालींना वेग आला असून लसीकरणासाठीची रंगीत तालीम पार पडल्यानंतर आता शनिवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १७ हजार ४११ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आलेली असून १९ हजार ५०० डोस उपलब्ध झालेले आहेत. यातून पहिल्या टप्प्यात केवळ ६०० कोरोनायोद्ध्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असला तरी इंग्लंडसह अनेक देशांत नवीन कोरोनाचा विषाणू आढळल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी नुकतीच ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेते वेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती ओळखपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
जिल्ह्याला ही लस प्राप्त झाली आहे, मात्र १९ हजार ५०० एवढेच डोस मिळालेले असल्याने प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात ८०० ऐवजी ६०० कोरोनायोद्ध्यांनाच लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६ लसीकरण केंद्रे कार्यरत केली गेली आहेत. पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या तसेच शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.
मोहिमेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुकजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. लसीकरणासंदर्भात आवश्यक असलेल्या बाबींची पूर्वतयारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचे पालन करून नुकतीच रंगीत तालीम घेतली गेली. आता प्रत्यक्षात शनिवारपासून लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही लसीकरणाविषयी उत्सुकता असल्याचे दिसून आले.
मार्चपासून कोरोनाने त्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो मृत्यूच्या घटनांनी जिल्ह्यात भीतीचे वातावरण होते. आता लसीचा चांगला पुरवठा झाल्याने कोरोनाशी लढू शकतो.- मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी