रवींद्र साळवेमोखाडा (पालघर) : मोखाडा एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत १७८ मूळ अंगणवाड्या व ५१ मिनी अंगणवाड्या असून, त्यातील २९४ बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यापैकी ४४ बालके एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार मृत्यूच्या दारात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा विश्वास सवरासारखे कुपोषण बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाच्या काळात पालघर जिल्ह्यात १८ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला असून, कुपोषणाचे हे भयाण वास्तव आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदार संघातील आहे.मोखाडा प्रकल्पांतर्गत येणाºया बºयाच अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. अंगणवाड्यांमध्ये आहार, स्वच्छता, पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाशी निगडित आहेत, परंतु हे विभाग कुपोषण निर्मूलनात अपयशी ठरत असून, आरोग्य विभाग आणि आदिवासी विभाग या प्रश्नाला बगल देत आहे. मोखाडा तालुका कुपोषणाच्या बाबतीत संवेदनशील असूनदेखील, येथील ग्रामीण रुग्णालयाला स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर लाभलेले नाहीत.अंगणवाडी सेविकांचा पगारदेखील वेळेवर होत नसून, या सेविकांनी ११ सप्टेंबरला आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहाराचा प्रश्न उद्भवला असून, पालघर जिल्ह्यातील १८ कुपोषित बालके या संप काळात दगावली आहेत.केवळ आश्वासनांचा पाऊसदरवर्षीच सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात येथील कुपोषण डोके वर काढते. मागील वर्षी याच भागातील सागर वाघ व ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याने, येथील कुपोषण चांगलेच गाजले होते.यानंतर, बालविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री विष्णू सवरा खासदार चिंतामण वनगा व अशा डझनभर मंत्र्यांनी या भागाचा दौरे करून, आश्वासनांचा पाऊस पाडला होता. मात्र, एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही.
४४ बालके मृत्यूच्या दारात, अंगणवाडी सेविकांच्या संप काळात पालघरमध्ये १८ बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 4:30 AM