मंगेश कराळे
नालासोपारा - घरफोडी करुन चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून ५ गुन्हे उघडकीस आणून चोरीचा १ लाख १० हजार ८४३ रुपयांचा किमती मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
नालासोपाऱ्याच्या हनुमान मंदिराजवळ येथील न्यू सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आनंद राजीव प्रसाद (२३) यांच्या घरी १३ सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान चोरी झाली होती. चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील दोन सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातील, अंगठ्या, रोख रक्कम असा २ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाच्या अनुशंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट देऊन कौशल्यपूर्ण तपास केला.
गुन्हयातील आरोपी हे विरार डि मार्ट परीसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्या परिसरात त्यांचा शोध घेत असतांना ते मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याच्या तयारीत असतांना दिसून आले. त्यांना पोलीसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना गुन्हे प्रकटिकरण पथकाकडुन त्यांना पकडण्यात यश आले आहे. आरोपी आकाश मनोज गुप्ता (२५) आणि सौरभ देवशरन यादव (२५) या दोघांना अटक करण्यात आलीे. अटक आरोपींकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक तपास केल्यावर आरोपींनी नालासोपारा व विरार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मागील काही दिवसामध्ये ५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १ लाख १० हजार ८४३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी आकाशविरुद्ध मिरा रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह आर्म्स ऍक्टचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी सौरभविरुद्ध कस्तुरबा मार्ग येथे २, नेहरू नगर येथे १, नवघर येथे १ आणि विरार येथे १ असे ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत मस्के, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, राजेश नाटुलकर, कल्याण बाचकर, प्रेम घोडेराव आणि सोहेल शेख यांनी केली आहे.