दहा, पन्नास, शंभर अन् पाचशे नव्हे; तर चक्क दोन हजाराच्या नोटांचा पाऊस पडला तर? नुसती कल्पना केली तरी काय गोंधळ उडेल याचा अंदाज येतो. पण वसईत खरंच असं घडलं आहे. वसईच्या मधुबन परिसरातील एका रस्त्यावर आज सकाळी दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पाहायला मिळाला आणि त्या गोळा करण्यासाठी एक झुंबड उडाली. नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि नागरिकांना नोटा गोळा करायला सुरुवात केली. पण नोटा उचलून पाहिल्या तेव्हा त्या खोट्या असल्याचं लक्षात आलं अन् सर्वांचा हिरमोड झाला.
वसईत भर रस्त्यात इतक्या नोटांचा खच नेमका आला कुठून असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला. इतक्या नोट्या नोटा कुणी टाकल्या याबाबत कुणालाच काही माहिती नव्हती. नंतर मात्र याठिकाणी एका वेब सीरिजचं चित्रीकरण सुरू असल्याचं कळालं. 'सन्नी' नावाच्या एका वेब सीरिजच्या चित्रीकरणासाठी २ हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या नोटा रस्त्यावर टाकण्यात आल्या होत्या. पण चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या नोटा तशाच ठेवण्यात आल्या. यामुळे नागरिकांसह लहान मुलांनी आज सकाळी नोटा गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
वसई, नालासोपारा भागात पसरली अफवादरम्यान, या घटनेमुळे वसई, नालासोपारा परिसरात वसईच्या मधुबन येथे नोटांचा पाऊस पडल्याची अफवा वेगानं पसरली. यामुळे मधुबन परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोठी गर्दी या परिसरात जमा झाली. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरुन गर्दी कमी केली.