पारोळ : वसई तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती असतांना वसई विरार महापालिकेच्या सूर्या जलवाहिनी तून रोज २०० टँकर पाण्याची चोरी कोपर व खराटतारा या गावातून होत आहे. हा भाग पेल्हार प्रभागात येत असल्याने शिरसाड येथील कार्यालय जवळ असतांना ही पाणीचोरी होते कशी हा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.पाणीचोरी ही सूर्याच्या जलवाहिनीचे पाणी विहिरीत टाकून व तिला इंजिन बसवून त्या मधून टँकर भरले जातात. एका टँकरचे दोनशे रुपये असा दर घेतला जातो. या पद्धतीने रोज लाखो लिटर पाण्याची चोरी या ठिकाणी होत आहे. या चोरीत महापालिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षा पासून ही पाणी चोरी सुरू असून या बाबत मागील वर्षी ही पाणीचोरी बाबत लोकमत ने आवाज उठवला होता. तेव्हा या ठिकाणी कारवाई झाली होती. पण या प्रकाराला या भागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची साथ असल्याने या वर्षी ही पाणी चोरी जोरात सुरू झाली आहे. वसई तालुक्यात पाणी टंचाई ची झळ असतांना जनतेच्या पाण्यावर माफिया डल्ला मारत असल्याने या प्रकार थांबविण्यासाठी वसई विरार महापालिकेने पाऊल उचलण्याची गरज आहे.कोपर येथे होत असलेल्या पाणी चोरी बाबत तपास करून कारवाई करण्यात येणार असून या मध्ये महापालिका कर्मचारी यांचे हितसंबंध असतील त्यांची ही चौकशी करण्यात येईल.- सुरेंद्र ठाकरे,पाणी पुरवठा अधिकारी वसई विरार शहर महापालिकाचोरी लक्षात येऊ नये म्हणून पाणी आधी विहिरीत टाकले जाते. व नंतर ते मोटारने टँकरमध्ये भरले जाते.