वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ माजली होती.ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याने त्या वेळेस काहीही हालचाल झाली नव्हती. धक्कादायक म्हणजे कुणाच्या तरी तक्रारीवरून आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता, अशी मधल्या काळात महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या मुद्यावरून टीका करताना महापालिका व बविआ नेत्यांना घरचा आहेर दिला होता. मुळातच या २२ कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून काढताना कुठलीही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नव्हती. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात या अभियंत्यांनी बविआचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली होती. या प्रकरणात न्याय कृती करण्याचे आश्वासन आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्या वेळी दिले होते.महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाला जाब विचारला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याची तयारीही त्यांनी केली होती. प्रशासनाने सेवा खंडित केलेल्या त्या २२ कनिष्ठ अभियंत्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचा शब्द दिल्याने या प्रकरणाची महासभेत चर्चा झाली नाही.चार महिने बेरोजगारमागील चार महिने बेरोजगार असलेले हे अभियंते महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.अखेर या पाठपुराव्याला यश आले असून २० जानेवारीपासून या सर्वांना त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
२२ कंत्राटी कनिष्ठ अभियंते पुन्हा सेवेत, तत्कालीन आयुक्तांनी बसवले होते घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:54 AM