- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : बहु प्रतिक्षित दहावीच्या निकाल अखेर मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन पद्धतीने लागला असून त्यात जव्हार तालुक्यातील बावीसपैकी तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश नक्कीच वाखाणण्याजोगे असल्याची प्रतिक्रीया शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त झाली. यात शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या जव्हार तालुक्यातील भारती विद्यापीठ इंग्लीश मिडीयम, वडोली हायस्कूल व एकलव्य आश्रमशाळा हिरडपाडा या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील सर्वात कमी निकाल शासकिय आश्रमशाळा नांदगांवचा असून ८५ विद्यार्थ्यांपैकी फक्त २७ विद्यार्थी पास झालेले असून एकूण ३३.७५ टक्के असा सर्वात कमी निकाल लागला. न्याहाळा हायस्कूलचा निकाल ३५.०० टक्के लागला आहे. तसेच तालुक्यातून एकूण २१०७ विद्यार्थी बसले होते तर त्यातील एकूण १८२२ विद्यार्थी पास झालेले आहेत. यंदाचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जव्हारमध्ये २२ शाळांपैकी ३ शंभर नंबरी
By admin | Published: June 14, 2017 2:49 AM