नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या तरतुदी महानगरपालिकेकडून गेल्या ६ वर्षात करण्यात आल्या. पण आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यासाठी मागविण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या औषधांचा काळाबाजार झाला असून या औषधांचे २५ कोटी कोणाच्या घशात गेले असा सवाल राजकुमार चोरघे यांनी केला आहे. वसई विरार महानगरपालिकेचा आरोग्य विभाग किटकनाशके आणि औषधांवर करोडो रूपये खर्च करत असून हा खर्च फक्त कागदोपत्रीच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय, नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील रुग्णालय, नालासोपारा व सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्र आणि इतर आठ दवाखान्यामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. डॉक्टरांची कमतरता, औषधांची उणीव आणि तुटपुंजी उपकरणे यामुळे आरोप आणि विवादामध्ये असणाऱ्या वसई विरार शहरातल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेल्या ६ वर्षात २५ करोड ३५ लाख ६६ हजार रुपये औषधांसाठी खर्च झाले आहेत. मात्र हा खर्च कागदावरच मर्यादित असून त्या रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात वसई-विरार मनपाच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्यासाठी खरोखरच औषधांवर खर्च केला आहे का ? हा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात येत असून याची चौकशी करावी, अशीही मागणी आता जोर धरु लागली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी तब्बस्सूम काझी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूकीत घोषित केल्याप्रमाणे एसआयटीकडून याची चौकशी करावी अशी मागणी होते आहे.
कोणत्या साली कितीची औषधे खरेदी केली...२०१४-२०१५ साली १ कोटी ६९ लाख ७२ हजार२०१५-२०१६ साली १ कोटी ९० लाख ४२ हजार२०१६-२०१७ साली १ कोटी ७५ लाख ९२ हजार२०१७-२०१८ साली ५ कोटी२०१८-२०१९ साली ७ कोटी२०१९-२०२० साली ८ कोटीसहा वर्षात एकूण २५ कोटी ३५ लाख ६६ हजारांची औषधे खरेदी केली.
आरोग्य विभागाने ६ वर्षांमध्ये २५ कोटींची औषधे खरेदी केली पण ती रु ग्णांना मिळाली का याचा कुठेही ठोक ताळेबंद का नाही ? यात पारदर्शकता का नाही ? वैद्यकीय विभागाने छुप्या पद्धतीने औषधे बाहेर काढून काळाबाजार केला असल्याचा संशय आहे. हे प्रकरण संवेदनशील असून आयुक्तांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. औषधाचा काळाबाजार झाल्याने रुग्णांना औषधे मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. - राजकुमार चोरघे (आरोपकर्ते)