हुसेन मेमन, जव्हार
जव्हार - जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरात प्राध्यापकांची दहा हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, ती पदे त्वरीत भरण्यात यावीत, विनाअनुदानीत व तासिका तत्वावर अध्यापन कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना अतिशय तटपुंजे वेतन दिले जाते, त्यांचा पुरेसे किमान वेतन मिळावे, तसेच 2005 नंतर नियुक्त केलेल्या प्राध्यापकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर न्याय मागण्यांसाठी हा राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने वरील मागण्यांची त्वरीत दखल घेऊन संप मिटविण्यासाठी पुढाकार अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या राज्य व्यापी संपात जव्हार येथील एकमेव गोखले एज्युकेशनचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहभागी झालेले होते. यावेळी जव्हार महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत धांडे, सचिव प्राध्यापक शैलेश बगदाणे, प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापिका प्रज्ञा कुलकर्णी यांनी संपात सहभाग नोंदवला होता.