नालासोपारा : कष्टाच्या २० रुपयांच्या मजुरीसाठी एका गरीब चावी विक्रेत्याला पोलिस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण करून त्याचे नाक फोडल्याची घटना १६ मे रोजी घडली होती. या घटनेची मानवी हक्क आयोगाने दखल घेऊन त्याला तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मीरा-भाईंदर, वसई-विरारपोलिस आयुक्तालयाला दिले आहेत. आयोगाने कडक ताशेरे ओढून कारवाई करण्याचे निर्देशही पाेलिसांना दिले आहेत.
मोहम्मद अली अन्सारी (वय ३३) यांचा माणिकपूर पोलिस ठाण्याच्या समोर चावी बनविण्याचा व्यवसाय आहे. १६ मे रोजीच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दोन चाव्या बनविण्यासाठी या ठिकाणी आली होती. या चाव्यांची ८० रुपये मजुरी होत असल्याचे सांगण्यात आले होते. चाव्या बनवून झाल्यानंतर आपण पोलिस असल्याची बतावणी करून केवळ ६० रुपये देऊन त्या व्यक्तीने अन्सारी यांना दमदाटी केली होती. या संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढत मारहाण केलेल्या मोहम्मद अन्सारी याला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
२० रुपयांसाठी फोडले नाक
उर्वरित २० रुपये या व्यक्तीने देणे आवश्यक असतानाही सरगरे यांनी उलटपक्षी अन्सारी यांना शिवीगाळ, दमदाटी करीत पोलिस ठाण्यातच मारहाण केली.
या मारहाणीदरम्यान त्यांच्या नाकावर जोरात प्रहार केल्याने अन्सारी रक्तबंबाळ झाले. यात नाकाचे हाड तुटून त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पोलिस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांच्याविरोधात गुन्हा माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सलगरे यांना पोलिस सेवेतून निलंबितही करण्यात आले.