पालघर : पालघर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या गणेश कुंड व परिसराच्या विकासासोबत पालघर, तलासरी, जव्हार, विक्र मगड, मोखाडा, वसई, या सहा तालुक्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ कोटी ४७ लाख ३१ हजार रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.पालघर जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून पालघर तालुक्यातील केळवे बीच, सफाळ्यातील दुर्गम किल्ले,सातपाटी चे पापलेट, बोंबील, केळी, विड्याची पाने, जव्हारचा राजवाडा,फेसाळणारे धबधबे, वारली पेंटिंग, बोर्डीचा शांत सुंदर समुद्र किनारा,वसईतील अर्नाळा,कळंब बीच, चर्च, किल्ले,डहाणू तील महालक्ष्मी, संतोषी माता मंदिर,बोटॅनिकल गार्डन इ. पर्यटनाला अनुकूल गोष्टीचा मोठा खजिना या जिल्ह्याला लाभला असल्याने पर्यटकांचा ओढा पालघर जिल्ह्यात वाढू लागला आहे.पालक मंत्री विष्णू सवरा आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या प्रयत्नाने पर्यटन स्थळांचा विकास आणि त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी निधी प्राप्त होत आहे.पालघर तालुक्यातील गणेश कुंडाची साफसफाई करून रुंदी वाढविणे,पादचारी रस्ता ,संरक्षक भिंत बांधणे यासाठी ९९ लाख ८१ हजार,तर कोकनेर पर्यटन स्थळा साठी ४७ लाख ६६ हजार,जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधब्या कडे जाणारा रस्ता बांधणे, संरक्षक भिंत उभारणे आणि,प्रसिद्ध दाभोसा धबधब्या कडे जाणारा रस्ता बांधणे,संरक्षक भिंत उभारणे यासाठी 46 लाख ६९ हजार,मोखाडा तालुक्यातील ओसरविरा पर्यटन स्थळा साठी २२ लाख १७ हजार,सूर्यामाळ पर्यटन स्थळाच्या सुशोभिकरणासाठी २४ लाख ९९ हजार,तलासरी तील झाई च्या समुद्रकिनार्यावरील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ७१ लाख, विक्रमगड तालुक्यातील हातोबा देवस्थाना जवळ स्वच्छतागृहे उभारणीसाठी १५ लाख,तर वसई तालुक्यातील पाणजू बेटाच्या पर्यटन विकासासाठी वास्तुविशारद सल्लागार नियुक्त करणे यासाठी २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या च्या अंतर्गत हे काम केले जाणार असून मे महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.(वार्ताहर)
पालघर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३ कोटी ४७ लाख
By admin | Published: April 01, 2017 5:07 AM