वसई : वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरातील एका व्यापारी संकुलात एकाच रात्रीत तब्बल २० व्यावसायिक कार्यालयांची शटर तोडून चोरी झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे. यामध्ये दुकाने, आॅफीसमध्ये असलेली रोकड, मोबाइल, कॅमेरा अशा वस्तू घेऊन चोरटे फरार झाले असून या चोरांचे चेहरे इमारतीच्या व कार्यालयांमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
वसई रोड रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर न्यू खोखणी भवन असून यामध्ये सर्व व्यावसायिक कार्यालय वापरासाठी आहेत. या ठिकाणी मोबाइल सर्व्हिस सेंटर, ट्युशन क्लासेस, फोटो स्टुडियो, सीए आणि सीएस अशी एकूण २० कार्यालये आहेत. गुरु वारी सकाळी हे कार्यालय उघडण्यासाठी जेव्हा विविध आॅफिसचे कर्मचारी आले तेव्हा या कार्यालयांत चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ येथे असलेले सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोन चोर आल्याचे दिसून आले.
या चोरांनी विविध कार्यालयांत असलेली रोकड चोरली असून त्याचबरोबर मोबाइल, डीएसएलआर कॅमेरा घेऊन फरार झाले आहेत. बुधवारी रात्री एक ते पहाटे चार-पाचच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला असून येथे असलेल्या २० कार्यालयांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याचे येथील विविध कार्यालयाच्या मालकांनी सांगितले. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुरु वारी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरांचे चेहरे कैद झाले असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.
गस्ती पथके निद्रेत?हाकेच्या अंतरावर रेल्वे पोलीस व माणिकपूर पोलिसांची दोन कार्यलये असताना व गुन्हे शाखेची बिट मार्शल व रात्रपाळीची गस्ती पथके कार्यरत असताना दोन चोर स्टेशन जवळच असलेल्या इमारतीतील २० शटर तोडतात व आत घुसून पहाटेपर्यंत चोºया करतात, इतके होईपर्यंत पोलीस व त्यांचे रात्रपाळीचे गस्ती पथक काय झोपा काढत होते का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.