आशीष राणे
वसई : जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वसईतील उसगाव व पेल्हार या दोन धरणांतील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे, मात्र वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालघरमधील सूर्या-धामणी धरणांत अद्यापही ३२.६२ टक्के पाणीसाठा असल्याने वसई-विरारकरांना पाणीबाणीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. सूर्या-धामणी धरणातील पाणीसाठा वर्षभर तरी पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी ‘लोकमत’ला दिली.
वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे सूर्या-धामणी हे मुख्य धरण वगळता उसगाव आणि पेल्हार या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्याची पातळी कमी झाल्याने यंदा पाणीकपात केली जाणार का, याबाबत आयुक्त आणि उपअभियंता पाणीपुरवठा सुरेंद्र ठाकरे यांना संपर्क केला असता तो झाला नाही. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी, तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता जून महिना संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला आहे. जिल्ह्यातील तीन धरणांपैकी पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६..३५ घनमीटर दशलक्ष लिटर (९०.१४१ दशलक्ष) म्हणजेच ३२.६२ टक्के तर वसई तालुक्यातील उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष (०.५६२ दशलक्ष), ११.३३ टक्के आणि पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर (०.११८ दशलक्ष ) म्हणजेच ३.३१ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.
जून महिना संपला तरी पावसाने जोरदार हजेरी न लावल्यामुळे वसई-विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई-विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहनवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनीदेखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.धरणात असलेल्या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत महापालिकेला अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. सूर्याच्या दोन्ही योजनांतून २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण ३६५ दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून २० तर पेल्हारमधून १० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. यात उसगाव धरणात १८ दिवस, तर पेल्हार धरणात ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.