हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ३३ बोटींपैकी सर्व बोटी क्यार चक्रीवादळाचा सामना करत गुजरात तर काही दमणच्या बंदरात सुखरूप पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर पालघर, डहाणू, वसई आणि उत्तन आदी भागातील खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १ हजार ४११ बोटींना माघारी परत बोलाविण्याच्या सूचना सहकारी संस्थांनी आपल्या वायरलेस सेट यंत्रणेच्या मदतीने दिल्या. वादळाचा इशारा मिळाल्यानंतर समुद्रात टाकलेली जाळी जेमतेम घेऊन या बोटी आपापल्या बंदराकडे मार्गाक्रमण करत असताना वादळाच्या तडाख्याने जोरदार वादळी वारे निर्माण होत मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यामुळे बंदर गाठण्यासाठी २० ते २२ तासांचा अवधी लागणार असल्याने व प्राप्त परिस्थितीत शक्य नसल्याने सुरक्षित किनारे शोधण्याच्या प्रयत्नात काही बोटी गुजरात, दीव-दमण भागात तर काही बोटी देवगड बंदरात नेण्यात आल्या.
सातपाटी बंदरातून २०० ते २२५ बोटी १६ ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. दिवाळीपूर्वी चांगले मासे मिळाल्यास खलाशी कामगार,बोटीचा तांडेल यांचे तीन महिन्यांचे पगार देऊन दिवाळी साजरी करण्याचे मनसुबे बोट मालकांचे होते. मात्र ढगाळ वातावरण आणि परतीचा पाऊस यामुळे मासेच मिळत नसल्याने सर्व हवालदिल झाले होते.कर्जाचा डोंगर वाढत जाणारयावर्षी एक ऑगस्टपासून सुरूवात झालेल्या मासेमारी हंगामापासून मच्छिमारांना पुरेसे मासेच न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका ठिकाणी माशांचा घसरलेला दर तर दुसऱ्या ठिकाणी या बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासे मिळत नसल्याने आमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याची खंत ऋ षिकेश मेहेर याने व्यक्त केली.तोटा सहन करून परत यावे लागलेक्यार चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिल्यानंतर १० दिवसात जमलेले ४० ते ५० किलो मासे घेऊन आम्हाला तोटा सहन करून परत यावे लागल्याचे भावेश मेहेर या मच्छिमाराने ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या मत्स्यगंधा, आदिमाया या दोन बोटी आणि अन्य विश्वकर्मा एक बोट अशा तीन बोटी शुक्र वारी रात्री दमणच्या बंदरात पोहचण्यासाठी निघाल्या मात्र बंदरात पोचण्याआधी वादळी वारे व लाटा उसळू लागल्याने समुद्रात नांगर टाकून आम्हाला काही तास थांबावे लागले. शनिवारी सकाळी वातावरण निवळल्याने बोटी दमणच्या बंदरात सुखरूप ठेवल्या आहेत.