मीरारोड - पोलीस आयुक्तालयाचा मनाई आदेश मोडून शुक्रवारी मीरा भाईंदर महापालिकेसमोरील रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहतांसह सहभागी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास भाईंदर पोलिसांना ३३ तास लागले. परंतु नया नगर पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या एका कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न समितीच्या ७ जणांवर अवघ्या ३ तासात गुन्हा दाखल केला. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ नोव्हेम्बर पर्यंत मनाई आदेश लागू केला आहे . मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न डेमोक्रेटिक सिटीझन कमिटीने मीरारोडच्या नया नगर भागात पॅलेस्टिनच्या नागरिकांवर अत्याचार झाल्याचे कारण देऊन निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली होती . परंतु नया नगर पोलिसांनी मनाई आदेश लागू असल्याने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून परवानगी नाकारली. तरी देखील कमिटीच्या वतीने २ नोव्हेम्बरच्या रात्री पावणे नऊ वाजे पर्यंत निदर्शने , घोषणाबाजी केल्याने हवालदार निवृत्ती कर्डेल यांच्या फिर्यादी वरून तीन तासात म्हणजेच ३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री १ च्या सुमारास सादिक पाशा, सुखदेव बिनबंसी, शाहिद प्रधान आदी ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला.
तर शुक्रवार ३ नोव्हेम्बर रोजी भाईंदर पश्चिमेस महापालिका मुख्यलाया बाहेरील रस्त्यावर मेहतांसह भाजपा जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक , पदाधिकारी आदींनी मुख्य रस्ता अडवून आंदोलन केले . रस्त्यावर क्रिकेट खेळले , खाली बसून राहिले व घोषणाबाजी केली . यामुळे वाहतूक बंद पडून विद्यार्थी , वृद्ध व नागरिक वाहनात अडकून पडले . त्यांना त्रास सहन करावा लागून वेठीस धरले गेले . रस्ता अडवून वाहतूक व रहदारीला अडथळा आणला असताना देखील पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्या ऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याने टीकेची झोड उठली . मेहता व आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने अनेकांनी पोलिसां कडे तक्रारी केल्या.
अखेर भाईंदर पोलिसांनी शनिवार ४ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५७ च्या सुमारास म्हणजेच आंदोलनाच्या ३३ तासांनी गुन्हा दाखल केला आहे . शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत आंदोलन केले . त्यावेळी रस्ता अडवून रस्त्यावर क्रिकेट खेळून , रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी केली . चालणारे पादचारी व रहदारीला अडथळा आणला तसेच पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून नरेंद्र मेहता सह भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा , माजी महापौर ज्योत्सना हसनाळे व डिम्पल मेहता , माजी उपमहापौर हसमुख गेहलोत , माजी नगरसेवक अरविंद शेट्टी ,संजय थेराडे , नयना म्हात्रे , रुपाली शिंदे , मदन सिंह , प्रशांत दळवी , अशोक तिवारी, अजित पाटील , दिनेश जैन ,वर्षा भानुशाली, शानू गोहिल, दिलीप जैन सह एकूण ४५ जणांच्या नावानिशी व अन्य १०० ते १२५ जण असे मिळून एकूण १४५ ते १७० गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक कतुरे तपास करत आहेत. तर अडवून धरलेला रस्ता मोकळा करण्या ऐवजी बंदोबस्तास असलेले उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांचे नरेंद्र मेहतांशी रस्त्यावर सुहास्यवदनाने हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर चर्चेत आले आहे . त्यावरून आता, हे तर पोलिसांच्या लांगुलचालनपणाचे आणखी एक उघड उदाहरण असल्याचा आरोप होत आहे.