नालासोपारा (मंगेश कराळे) : गुरुवारी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट तीनची टीम निवडणूक पेट्रोलिंग करत असताना सिविक सेंटर जवळ सीएमएस नावाच्या कंपनीची एटीएमला पैसे पुरविणारे वाहन पकडले आहे. या वाहनात साडे तीन कोटींची रक्कम सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. वाहनातील कागदावर रकमेची नोंद कमी व सापडलेली रक्कम जास्त सापडली असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने ही रोकड असलेले वाहन जप्त केली असून त्यांची चौकशी करत आहे.
गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास एका एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद रोकड असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने ही व्हॅन आणि त्यातील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. बॅंकेच्या एटीएम मध्ये भरण्यासाठी ही रक्कम आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र व्हॅन मध्ये असलेले साडेतीन कोटी रुपयांचा हिशोब जुळत नसल्याने या रकमेबाबत संशय निर्माण झाला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे हे घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी हजर झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच बविआचे कार्यतर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. ही घटना संशयास्पद आहे. या गाडीत साडेतीन कोटी रुपये असल्याचे समजते. त्यापैकी केवळ ४५ लाखांचा हिशोब जुळत आहे. उर्वरित रोकड कुणासाठी आणली? कुणी आणली? त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी बविआचे नेते उमेश नाईक यांनी केले आहे.
सीएमएस नावाची कंपनीची गाडी मिरा भाईंदर वसई विरार परिसरात बँकांच्या एटीएमला पैसे पुरविण्याचे काम करते. निवडणूक आयोगाने निवडणूक काळासाठी ज्या नियमावली दिलेल्या आहेत त्या पाळल्या नाहीत. पकडलेल्या गाडीच्या कागदपत्रांवर ४५ लाख रुपये असल्याची नोंद आहे पण गाडीत तीन कोटींच्या वर रक्कम आढळून आलेली आहे. पंचनामा झाल्यावर नेमकी किती रक्कम आहे हे कळू शकेल. कोणत्याही राजकारणी पार्टीचा यात काही संबंध नाही. काही तांत्रिक चुकी झालेल्या असून बँकेचे पैसे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.