बोर्डी : तलासरी या दुर्गम आदिवासी तालुक्यातील गिरगाव आरजपाडा शाळेतील जिग्नेश सुकर फराले (रा. कटेलपाडा) या विद्यार्थ्यांने प्रत्येक विषयात ३५ टक्के गुण मिळवून अनोखा विक्र म नोंदवला आहे. त्यामुळे तालुक्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याचे गुणपत्रक व्हायरल होत आहे.
आरजपाडा शाळेतील हा विद्यार्थी कृश अंगयष्टी आणि अभ्यासातील सुमार कामगिरीमुळे अन्य विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. तो रोज वर्गात येऊन बसायचा. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत भाग न घेताही, आर.टी.ई.च्या नियमानुसार तो सहज आठवीपर्यंत उत्तीर्ण झाला. मात्र नववी इयत्तेत अनुत्तीर्ण होऊनही दहावीच्या वर्गात न चुकता येऊन बसू लागला. शाळा सुरू झाल्यावर काही दिवस शिक्षकांना त्याला समजावण्यास गेले. परंतु त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो शाळाबाह्य होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, उलटपक्षी शाळेलाच त्याची पुन:परीक्षा घेऊन दहावीच्या वर्गात सन्मानाने बसवावे लागले आणि तो बोर्डाच्या परीक्षेला सामोराही गेला. या जि.प.च्या शाळेतील दहावीची ही पहिलीच बॅच असल्याने निकालाचा आलेख उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांवर होती, मात्र जिग्नेशची शाश्वती वाटत नव्हती. मात्र निकाल जाहीर होताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आॅनलाइन निकाल पाहताना जिग्नेशचा निकाल पाहून धक्काच बसला.